Maharastra Rain । सध्या राज्यभर पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी मान्सून देखील राज्यात उशिरा दाखल झाला. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये काही प्रमाणात पाऊस बरसला यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने चांगलेच विश्रांती घेतली. यानंतर सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर दोन दिवस पावसाला सुरुवात झाली आता मात्र पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पिकांना पाणी कुठून द्यावे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. (Maharastra Rain )
राज्यातील अहमदनगर, पुणे, सोलापूर इत्यादी जिल्ह्यामध्ये पाण्याची परिस्थिती अतिशय भयानक आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोथरे या ठिकाणच्या एका शेतकऱ्याने पाऊस पडत नसल्यामुळे आपली दोन एकर लिंबाची बाग उपटून पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस नसल्याने लिंबाची बाग जळू लागल्याने शेतकऱ्यांना हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
पाणी नसल्याने बाग सांभाळणं कठीण
करमाळ्यातील या शेतकऱ्याची लिंबाची बाग त्याच्या डोळ्यात देखत पाण्याआभावी जुळू लागली होती. त्यामुळे या शेतकऱ्याने संतप्त होऊन हा मोठा निर्णय घेतला आहे. लांबलेला पाऊस आणि कमी झालेली पाणी पातळी यामुळे लिंबाची बाग सांभाळणं शेतकऱ्यांसाठी कठीण होते. त्यामुळे त्याने दोन एकर लिंबाची बाग उपटून पेटवून दिली आहे. त्याचबरोबर लिंबोणीला आतापर्यंत कधीच नुकसान भरपाई मिळाली नसल्याची खंत देखील यावेळी या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
राज्यातील अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
राज्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिली आहे. तुरळकी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र खरीपाची पिकं वाचवण्यासाठी राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत. काही शेतकऱ्यांची खरीप पिके वाया गेली तर काही शेतकऱ्यांची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आगामी काळात जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांची खरीप पिके वाया जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.