Animal Husbandry । देशात मोठ्या प्रमाणावर शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. यातून केवळ दूध विक्रीतून नाही तर शेणखत विक्रीतूनही पैसे मिळवता येतात. जर तुम्ही योग्य ते नियोजन केले तर तुम्हाला या व्यवसायातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल करता येईल. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका देखील बसत असतो.
पशुपालकवर्ग लंपी या जीवघेण्या रोगातून सावरत नाही तोच आणखी एका रोगाने डोके वर काढले आहे. सध्या लाळ खुरकत रोगामुळं पशुपालक हैराण झाले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या रोगामुळे प्रत्येक वर्षी 12 ते 14 हजार कोटी रुपयांचे नुकसान पशुपालकांचे होत असते. त्यामुळे यंदा 11 ते 17 सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय लाळ खुरकत रोग नियंत्रण जागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे.
लक्षणे
- जनावरांना 102-106 अंश पर्यंत तीव्र ताप येतो.
- तोंडातून सतत लाळ गळते.
- हळूहळू तोंडातील आतील भागावर, जिभेवर, हिरड्यावर, कासेवर, खुरामध्ये फोड येण्यास सुरुवात होते.
- फोड फुटून अल्सर सारखी जखम होते. त्यामुळे ते चारा खात नाहीत.
- पंधरा दिवसात रोगाची प्रत्यक्ष लक्षणे दिसतात.
- परंतु लहान वासरांमध्ये हा आजार झाला तर काहीही लक्षणे न दिसता ती मरण पावतात.
कसा होतो प्रसार?
- बाजारातून होणारी जनावरांची खरेदी विक्री हे आजाराच्या प्रसाराचे एक मुख्य कारण आहे.
- श्वासोच्छ्वासाद्वारे,हवेतून, गव्हाणी, गोठ्यावर येणाऱ्या व्यक्ती, शेण, मुत्र, दूध चारा,वाहने, पाळीव प्राणी यांच्यामुळे हा आजार होतो.
- तोंडखुरी-पायखुरी हा शेळ्या, मेंढ्या, गायवर्ग, म्हैस वर्ग, वराह यासारख्या दोन खूर असणाऱ्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे.
उपाय आणि उपचार
- वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे.
- वासरे चार महिन्यांची झाली की त्यांना लसीचा पहिला डोस द्यावा. एक महिन्यानंतर लसीचा दुसरा डोस द्यावा.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीकरण सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरण असताना करावे.
- समजा हा आजार एखाद्या जनावराला झाला तर त्याची स्वत्रंत देखभाल करावी.
- पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार त्या जनावराचा औषधोपचार करावा.
- तोंडातील जखमांवर बोरो ग्लिसरीन लावावे.
- नाचणीचे पीठ, मध, लोणी यांचा लेप तोंडातील व्रणांवर द्या.
- जखमा 2 टक्के खाण्याचा सोडा, 1 टक्के पोटशीयम परमंग्नेट किंवा तुरटीच्या 1 टक्के द्रावणाने दिवसातून किमान दोन-तीन वेळा धुवा.